सावधान, पुढे गाव आहे' अशा अनोख्या नावामुळे दिग्दर्शक मुन्नावर शमीम भगत यांचा हा नवीन मराठी चित्रपट सध्या चर्चेत आहे. आपल्या नावाप्रमाणेच या चित्रपटाचा विषयही अनोखा आहे. उन्हाच्या तीव्र झळा झेलाव्या लागत असल्यामुळे हिरव्या निसर्गाची मनुष्याला आठवण येतेय. अशाच विचारधारेला धरून व शहरात बसलेल्यांना गावाकडे परतण्यासाठी साद घालणारा ‘सावधान, पुढे गाव आहे' हा चित्रपट आहे.

सावधान, पुढे गाव आहे' या चित्रपटाचे संगीतही अनोखे बनले असून तेही सामाजिक संदेश देण्यात यशस्वी झाले आहे. संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी रितेशकुमार नलिनी यांनी उचलली आहे. त्यांनी चित्रपटातील एका कव्वालीसाठी तरुण दमाचा गायक गुरबिंदर सिंग याला संधी दिली आहे. हा एक अनोखा योग म्हणावा लागेल. तो असा की मराठी चित्रपटासाठी उर्दू शब्द असलेली कव्वाली पंजाबी गायकाच्या आवाजात ध्वनिमुद्रित होणे.

छोट्या पडद्यावरील कार्यक्रम पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी गुरबिंदर सिंग हे नाव नवीन नक्कीच नाहीये. त्याने फगवारा येथील लव्हली युनिव्हर्सिटी च्या ‘स्पेक्ट्रा कॉम्पिटिशन’ मध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावलेले आहे. ‘ऑल इंडिया रेडियो’ च्या सुगम संगीत स्पर्धेत २०१७ साली पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याने २०१३ साली ‘व्हॉइस ऑफ पंजाब’ या सिंगिंग रिऍलिटी शोमध्येमध्ये दुसरा क्रमांक मिळविला होता व झी टीव्हीवरील ‘सारेगमप’ या सुप्रसिद्ध कार्यक्रमात तो शेवटच्या ७ जणांत होता. त्याला रमाझ म्युझिक कंपनीचे ‘जान मेरी....’ हे पंजाबी गाणे गायला मिळाले जे खूपच गाजले.

मराठी चित्रपट ‘सावधान, पुढे गाव आहे' मधील या उर्दू कव्वालीमुळे पंजाबी गायक गुरबिंदर सिंगला पुढे भरपूर गाण्याच्या संधी मिळतील अशी भावना चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक व संगीत दिग्दर्शक यांनी व्यक्त केली आहे.