सौरभ सिन्हा दिग्दर्शित ‘सावट’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री स्मिता तांबे मुख्य भूमिकेत झळकणार असून ती एका इन्वेस्टिगेटिव्ह ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेला न्याय देण्यासाठी स्मिता प्रचंड मेहनत घेत असल्याचं पाहायला मिळत आहे.

या भूमिकेला न्याय देण्यासाठी स्मिताने तिच्या हेअर स्टाईलमध्ये बदल केला आहे. तिने तिचे लांबसडक केस कापले आहेत. त्यासोबतच एका पोलीस अधिकाऱ्यामधील करारी भाव, त्याची वागण्या-बोलण्याची पद्धतही तिने आत्मसात केली आहे. विशेष म्हणजे एखादी केस सोडवत असताना तिच्यातील बारकावे कसे समजून घ्यायचे हेदेखील ती शिकत आहे.

स्मिताने आतापर्यंत वैविध्यपूर्ण सशक्त स्त्री भूमिका करुन सिनेसृष्टीत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मात्र या चित्रपटात ती पहिल्यांदाच पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे. आदिती देशमुख असं स्मिताच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे.

आजवर मराठी-हिंदी चित्रपटांमधून अनेक अभिनेत्रींनी पोलिसी खाक्याच्या भूमिका साकारल्या. त्यामुळे अशा भूमिका आपल्याला नवीन नाहीत. म्हणूनच आदिती देशमुखच्या भूमिकेत काहीतरी नाविन्य आणण्याची जबाबदारी माझ्यावर होती. भूमिकेचा अभ्यास करताना मला लक्षात आलं. आदितीची निरीक्षणक्षमता खूप चांगली आहे. ती शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करून गुन्हे सोडवणारी ऑफिसर आहे. आपल्या गतकाळातल्या अनुभवांनंतर ती थोडीशी रागीट आणि आक्रमक आहे. मग तिच्या शारीरिक अभिनयावर काम करणं जरूरीचं होतं,” असं स्मिताने सांगितलं.

दरम्यान, ‘सावट’ हा चित्रपट सुपरनॅचरल थ्रिलर आहे. श्रावण महिन्यातल्या एका ठराविक रात्री एका गावात दरवर्षी एक आत्महत्या होते. सात वर्षात सात आत्महत्या झालेल्या या गावात इन्वेस्टिगेटिव्ह ऑफिसर आदिती देशमुख आत्महत्यांचा तपास करायला येते. आणि मग काय घडतं ते या चित्रपटात पाहायला मिळतं.

हा चित्रपट २२ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.