विक्रम फडणीस लिखित आणि  दिग्दर्शित 'स्माईल प्लीज' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला.

हा ट्रेलर बॉलिवूडचा किंग शाहरुख खानच्या हस्ते लॉन्च करण्यात आला. त्याच सोबत  म्युझिक अल्बमचेही अनावरण करण्यात आले. ‘’विक्रम आणि माझी खूप जुनी मैत्री आहे. विक्रमचा फॅशन डिझायनर ते दिग्दर्शकापर्यंतचा प्रवास खूपच रंजक आहे. मी विक्रमला एकदा म्हणालो एखादा विनोदी चित्रपट बनव. त्यावर त्याचे उत्तर होते, ‘ हा चित्रपट माझ्या हृदयाच्या खूप जवळचा आहे. या चित्रपटाशी माझे भावनिक नाते आहे.' चित्रपटचा ट्रेलर बघताना मला याची प्रचिती आलीच. त्याने हा चित्रपट खूप मनापासून बनवला आहे. चित्रपटातील कसलेले कलाकार, उत्कृष्ट पटकथा, त्याला साजेशी गाणी अशी एकंदरच मस्त भट्टी जमून आली आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या हृदयात जागा बनवून चेहऱ्यावर नक्कीच स्माईल आणेल.’’असे उद्गार या वेळी शाहरूख खान याने काढले.    

संगीतकार रोहन-रोहन आणि त्यांच्या टीमने धमाकेदार परफॉर्मन्स सादर करत सोहळ्यात अधिकच रंगत आणली. या वेळी प्रिया बापट, उमेश कामत, अवधूत गुप्ते, बेला शेंडे, मानसी नाईक, पुष्कर जोग, राहुल पेठे आदी मराठी सिनेसृष्टीतील कलाकारआणि मान्यवर उपस्थित होते..

'स्माईल प्लीज' या चित्रपटात मुक्ता बर्वे, प्रसाद ओक, ललित प्रभाकर, अदिती गोवित्रीकर, सतीश आळेकर, तृप्ती खामकर, वेदश्री महाजन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या १९ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.