सुबोध भावे आणि मुक्ता बर्वे यांची प्रमुख भूमिका असलेला  'हृदयांतर' सिनेमाला अभूतपूर्व यश मिळाले लोकांच्या मनात या सिनेमाच्या कथेने वेगळी जागा निर्माण केली तर आता तेच दिग्दर्शक विक्रम फडणीस एक नवीन सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत तो म्हणजे 'स्माईल प्लीज'. या चित्रपटाच्या मुहूर्त सोहळ्याची सुरुवात बॉलिवूडचा सुपरस्टार 'हृतिक रोशन'च्या हस्ते काही दिवसांपूर्वीच झाली.

मुक्ता बर्वे

यावेळी मुक्ता बर्वे, ललित प्रभाकर, प्रसाद ओक, अदिती गोवित्रीकर, तृप्ती खामकर या कलाकारांनी चित्रपटातील आपापल्या पात्रांची ओळख करून दिली. या प्रसंगी अमिषा पटेल, झरीन खान, रॉनीत रॉय, किआरा अडवाणी, श्वेता बच्चन- नंदा अशा बॉलिवूडमधील आणि मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी उपस्थित राहून विक्रम फडणीस आणि 'स्माईल प्लीज' चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या.

मुक्ता बर्वे

"विक्रमचे काम मला माहित आहे, तो एक उत्तम दिग्दर्शक आहे. स्वतःला कामात पूर्णपणे झोकून देण्याची त्याची जी सवय आहे, कोणतीही गोष्ट त्याच्या डोक्यात स्पष्ट असल्यामुळेच तो, ती उत्तमरित्या साकारू शकतो. विक्रमच्या 'हृदयांतर' या चित्रपटात मी छोटीशी भूमिका साकारली होती. त्यामुळे तो सर्वांना कशा प्रकारे सामावून घेतो, याची मला कल्पना आहे. भावनिकता आणि व्यावहारिकता याचा सुंदर मेळ त्याच्या चित्रपटात अनुभवायला मिळतो. विक्रमचा 'स्माईल प्लीज' हा चित्रपट प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू आणेल", अशी प्रतिक्रिया हृतिक रोशन याने यावेळी दिली.

मुक्ता बर्वे

'स्माईल प्लीज' या चित्रपटाच्या नावावरूनच हा चित्रपट आयुष्याकडे पाहण्याचा आणि आयुष्य आनंदाने जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोन देणारा असावा. 'हृदयांतर' सारख्या उत्कृष्ट कलाकृतीनंतर पुन्हा एकदा विक्रम नवीन विषय असलेला एक भावनाप्रधान चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन येणार असून या चित्रपटाच्या निमित्ताने विक्रम आणि मुक्ता पुन्हा एकदा एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे या चित्रपटातही रसिकांना काहीतरी वैविध्यपूर्ण पाहायला मिळणार हे नक्की.