सुमन काकी म्हणून लोकप्रिय असणाऱ्या 'लागीरं झालं जी' मधली शिवानी घाटगे,शीतलीच्या काकीच्या भूमिकेतील शिवानी आता थेट रुपेरी पडद्यापर्यंत. लवकरच सुमन काकी उर्फ शिवानी घाटगे 'पळशीची पीटी' या मराठी चित्रपटातून एका नव्या भूमिकेत रंग भरायला सज्ज आहे. धोंडिबा बाळू कारंडे निर्मित-दिग्दर्शित 'पळशीची पीटी' या चित्रपटातून शिवानी मुख्याध्यापिका माळी बाईंच्या भूमिकेत दिसणार असून येत्या २३ ऑगस्टला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

शिवानी घाटगे

नावाप्रमाणेच हटके कथानक असणाऱ्या 'पळशीची पीटी' या चित्रपटाची कथा 'भागी' नावाच्या मुलीभोवती गुंफलेली आहे. ग्रामीण भागातील उदासीन शिक्षणपद्धतीवर मार्मिकपणे भाष्य करणाऱ्या या चित्रपटात शिक्षकांची भूमिका किती मौल्यवान असते हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 'पळशीची पीटी' मध्ये शिवानी हेच सत्य मुख्याध्यापिका माळी बाईंच्या रुपाने उलगडणार आहे. या भूमिकेविषयी तिला विचारलं असता, ''हा माझा पहिलाच चित्रपट असून दिग्दर्शक धोंडिबा कारंडे यांची मी आभारी आहे की त्यांनी माझ्यातले कलागुण ओळखले. 'पळशीची पीटी' चित्रपटातील मुख्याध्यापिका माळी मॅडम साकारणं माझ्यासाठी खूप वेगळा अनुभव होता. मालिकेत मी एका समंजस गृहिणीची भूमिका साकारली होती जी प्रथम कुटुंबाचा विचार करते पण मुख्याध्यापिका माळी हे एक करारी व्यक्तिमत्त्व आहे त्यांच्या हाती संपूर्ण शाळेची आणि उद्याच्या होतकरू युवा पिढीची जबाबदारी आहे. थोडं कठीण होतं पण दिग्दर्शकांच्या अनुभवी मार्गदर्शनामुळे काम बरंच सोप्पं झालं''  

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये नावाजला गेलेल्या 'पळशीची पीटी'मध्ये शिवानी सोबतच ऍथलेट 'भागी'च्या प्रमुख भूमिकेत किरण ढाणे आणि राहुल मगदूम झळकणार आहे. शिवाय काही कलाकारांची नावं अजूनही गुलदस्त्यात असून लवकरच त्यांची नावे रसिकांसमोर येतील. तूर्तास सुमन काकी नंतर मुख्याध्यापिका माळी मॅडमचा लूक सोशल मीडियावर तुम्ही पाहू शकता.

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi