अशोक सराफ, सचिन पिळगांवकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे या तिघांनी मराठी चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एका हिट चित्रपट दिले आहेत.अशोक सराफ यांचा आज म्हणजेच ४ जूनला वाढदिवस असून त्यांनी केवळ मराठीच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. त्यांनी आजवर अनेक हिट चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. आयत्या घरात घरोबा, एक डाव भुताचा, अशी ही बनवाबनवी अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. हम पाच या मालिकेत त्यांनी साकारलेला आनंद माथुर तर आजही प्रेक्षकांच्या चांगलाच लक्षात आहे. अशोक सराफ यांनी करण अर्जुन, यस बॉस यांसारख्या अनेक हिंदी चित्रपटांमध्ये साकारलेल्या भूमिका चांगल्याच गाजल्या होत्या.

अशोक सराफ

अशोक सराफ, सचिन पिळगांवकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे या तिघांनी मराठी चित्रपटसृष्टीला एकापेक्षा एका हिट चित्रपट दिले आहेत. हे तिघे खऱ्या आयुष्यातही खूप चांगले मित्र होते. सचिन आणि अशोक सराफ यांनी काही महिन्यांपूर्वी NO. 1 यारी विथ​ स्वप्निल या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से या कार्यक्रमात अभिनेता स्वप्निल जोशीला सांगितले होते. अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे हे तर अनेक वर्षं एकमेकांचे शेजारी देखील होते. मुंबईतील अंधेरीमधील आंबोली या परिसरातील एका इमारतीत हे दोघे एकमेकांच्या शेजारी शेजारी राहात होते. अनेक वर्षं अंबोलीमध्ये राहिल्यानंतर अशोक सराफ लोखंडवालाला तर लक्ष्मीकांत वर्सोवाला राहायला गेले. विशेष म्हणजे खऱ्या आयुष्यात शेजारी असलेल्या या दोघांनी शेजारी शेजारी या चित्रपटात देखील काम केले होते.