प्रेक्षकांचा लाडका अभिनेता स्वप्निल जोशीला बिग बॉस 13 साठी विचारण्यात आले होते. बिग बॉस या कार्यक्रमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असतात. या कार्यक्रमाचा 13 वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून या सिझनची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी सध्या अनेक सेलिब्रेटींना विचारण्यात येत आहे. प्रेक्षकांचा लाडका अभिनेता स्वप्निल जोशीला देखील बिग बॉस 13 साठी विचारण्यात आले होते. पण त्याने या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी चक्क नकार दिला आहे. त्यानेच ही गोष्ट एका मुलाखतीच्या दरम्यान सांगितली आहे.

स्वप्निल जोशीला मराठी चित्रपटसृष्टीत चॉकलेट हिरो म्हणून ओळखले जाते. त्याने मराठीत एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. पण मराठीसोबतच त्याने हिंदीत देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. कृष्णा या मालिकेपासून त्याने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर हद कर दी आपने, अमानत यांसारख्या हिंदी मालिकांमध्ये तो झळकला. याचसोबत त्याने गुलाम ए मुस्तफा या चित्रपटात देखील महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यामुळे त्याला मराठीच नव्हे तर अमराठी भाषिक लोकांमध्ये देखील खूप चांगले फॅन फॉलोव्हिंग आहे. त्यामुळेच बहुधा त्याला बिग बॉस 13 साठी विचारण्यात आले होते.

याविषयी दैनिक भास्करशी बोलताना स्वप्निलने सांगितले की, बिग बॉससाठी मला विचारण्यात आले होते हे खरे आहे. हा कार्यक्रम एक प्रेक्षक म्हणून मला आवडतो. पण या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून सहभागी व्हायचा मी विचार देखील करू शकत नाही. बिग बॉसच्या घरात जाणाऱ्या व्यक्तीकडे खूप पेशन्स असणे आवश्यक आहेत, ते माझ्याकडे नाहीयेत. मी रणांगण या माझ्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बॉस मराठीमध्ये काही तासांसाठी गेलो होतो. तो अनुभव माझ्यासाठी खूप चांगला होता. पण घरात इतके महिने घालवणे माझ्यासाठी अशक्य आहे.