दिग्दर्शक डॉ सलील कुलकर्णी यांचा 'वेडिंगचा शिनेमा’बद्दल प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली असताना या चित्रपटातील अजून एक महत्त्वाची गोष्ट समोर आली आहे. चित्रपटात शिवाजी साटम आणि अलका कुबल ही जोडी या चित्रपटात महत्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारताना बघायला मिळणार आहेत. तब्बल २३ वर्षांनी ते या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर एकत्र आले आहेत. ‘सीआयडी’फेम शिवाजी साटम आणि ‘माहेरची साडी’मुळे आजही लक्षात राहिलेली अलका कुबल यांचा स्वतःचा असा एक चाहता वर्ग आहे. हे दोघे तब्बल दोन दशकानंतर एकत्र येत असल्याने या चित्रपटाची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. बहुप्रतीक्षित ‘वेडिंगचा शिनेमा’ १२ एप्रिल रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

त्या सहीत अभिनेत्री मुक्ता बर्वे, कॉमेडीचा बादशहा भाऊ कदम आणि लेखक-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्याबरोबर अश्विनी काळसेकर, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे, शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार हे कलाकारसुद्धा दिसणार आहेत. या चित्रपटाची कथा सलील कुलकर्णी यांनी लिहिली असून पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन या सर्वच आघाड्यांवर सलील कुलकर्णी यांनी स्वतःचे नाणे खणखणीतपणे सिद्ध केले आहे, याचीही प्रचिती प्रेक्षकांना हा चित्रपट देईल.