लग्न म्हटले कि आपल्या डोळ्यासमोर धावपळ, गडबड, गोंधळ अशा कित्येक गोष्टी उभ्या राहतात. अलीकडे लग्न म्हणजे जणू भव्यदिव्य सोहळाच असतो. कालानुरूप लग्न या संकल्पनेचे स्वरूप बदलत चालले आहे. अगदी पारंपारिक रीतिरिवाज ते आधुनिक काळातील ट्रेंड या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन हल्ली लग्नसोहळे पार पडताना आपण बघतो. अशाच एका लगीनघाई ची गोष्ट सांगणारा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, प्रवीण तरडे अशी एकापेक्षा एक तगडी स्टारकास्ट असलेल्या या ‘वेडिंगचा शिनेमा’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला. मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातलं लग्न आणि पुढे होणारी लगीन घाई याची धम्माल गोष्ट सांगणारा ‘वेडिंगचा शिनेमा’ एप्रिल महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

लग्नाची बदलत चाललेली संकल्पना आणि त्यातून घडणाऱ्या धम्माल गंमती जंमती या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. पारंपरिक रीतीरिवाज ते लग्नातले आधुनिक ट्रेंड यांचा मेळ हल्ली भारतीय विवाह सोहळ्यांमध्ये पाहायला मिळतो. मात्र यांचा ताळमेळ साधताना अनेक मजेशीर गोष्टी घडत असतात याच विषयाची हलकी फुलकी कथा ‘वेडिंगचा शिनेमा’त दाखवली आहे.

मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, प्रवीण तरडे यांच्यासोबतच सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे यांसारखे कलाकारही या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. ‘वेडिंगचा शिनेमा’ तून शिवराज वायचळ आणि रिचा इनामदार ही नवोदित जोडीही चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. डॉ. सलील कुलकर्णी यांनी चित्रपटाची कथा लिहिली असून दिग्दर्शनाची धुरादेखील त्यांनीच सांभाळली आहे. हा चित्रपट १२ एप्रिल २०१९ रोजी प्रदर्शित होत आहे.