अनेक राष्ट्रभक्तांच्या बलिदानातून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालंय, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भरपूर सुधारणा झाल्या आहेत, पण तरीही समाजहिताचे बरेच प्रश्न सुटण्याची गरज आहे. स्वतंत्र भारताचा मला अभिमान आहे हे ठामपणे, सच्चेपणाने म्हणायचं असेल, आज अनेक बदल घडायला हवेत. हे बदल सामान्य जनताच घडवू शकते, हे दाखवून देणाऱ्या ‘आता बस्स’ या मराठी चित्रपटातील ‘वंदे मातरम’ या देशभक्तीपर शीर्षकगीताचे तसेच चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण नुकतेच आ.प्रवीण दरेकर यांच्या हस्ते करण्यात आले. अमित वाधवानी, मुंबई बँकेचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, उपाध्यक्ष पुरुषोत्तम दळवी,संचालक विठ्ठल भोसले, आशिष गोएल, जीवनलाल लावाडिया,प्राध्यापक डॉ.गणेश चंदनशिवे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

हे शीर्षक गीत म्हणजे आजच्या सामान्य जनतेच्या भावनांचे प्रतिबिंब आहे। भ्रष्टाचार, बेकारी जातीय तेढ या वर सामान्य माणसाची प्रतिक्रिया या गाण्यातून व्यक्त होते आहे. सुबोध पवार लिखित या गीताला ‘चक दे इंडिया’ फेम कृष्णा बरुआ यांनी स्वरबद्ध केले आहे. विजय गटलेवार यांचे संगीत या गीताला दिलं आहे. विद्याधर जोशी, सुनील बर्वे, अभिजीत पानसे, संतोष जुवेकर, सुशांत शेलार, पुष्कर श्रोत्री, प्रदीप पटवर्धन, आदित्य देशमुख, संदीप कोचर हे नामवंत कलाकार या शीर्षकगीतामध्ये आहेत.

सामान्य नागरिकांची होणारी घुसमट ‘आता बस्स’ या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला असून सामान्य माणसांनी मनात आणले तर तो काय बदल घडवू शकतो? हे दाखवून देणारा हा चित्रपट प्रत्येकाला अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा देईल असा विश्वास निर्माते अॅड.पंडित राठोड यांनी याप्रसंगी व्यक्त केला.

ए.आर क्रिएशन अँड एन्टरटेंन्मेंट आणि निर्मल फिल्मस प्रोडक्शन यांची निर्मिती असलेल्या आता बस्स’ चित्रपटाचे दिग्दर्शन शिरीष राणे यांनी केले आहे. संदीप पाटील, अॅड.पंडित राठोड, अलंक्रीत राठोड या चित्रपटाचे निर्माते आहेत. सयाजी शिंदे, अनंत जोग, मनोज जोशी, विक्रम गोखले, मुक्ता बर्वे, अनंत महादेवन, संजय मोने, डॉ. विलास उजवणे यांच्यासह मराठीतील अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात आहेत. कथा आनंद म्हसवेकर यांची असून पटकथा व संवाद योगेश गवस आणि शिरीष राणे यांनी लिहिले आहेत. छायांकन धनंजय कुलकर्णी यांचे आहे.

1100x470_AP_Tellychakkar_Bottom_widget_Marathi