‘स्टार प्रवाह’वरील ‘एक टप्पा आऊट’चा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. अटीतटीच्या या सामन्यात मालाडचा गोरेगावकर अर्थातच अनिश गोरेगावकरने बाजी मारत ‘एक टप्पा आऊट’चं विजेतेपद पटकावलं. तर उपविजेतेपदाचा मान पटकावला लातूर पॅटर्न बालाजी आणि अमरावतीचा करामती प्रविण प्रभाकरने. खास बात म्हणजे ते तिनही स्पर्धक आरती सोळंकीच्या टीममधले होते. तिन्ही स्पर्धकांनी महाअंतिम फेरीपर्यंत धडक मारल्यामुळे आरतीचा आनंद गगनात मावत नव्हता.

अनिश गोरेगावकर ठरला ‘एक टप्पा आऊट’चा महाविजेता

या विजयाबद्दल सांगताना आरती म्हणाली, ‘आजवर मी बऱ्याच स्पर्धांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले पण ‘एक टप्पा आऊट’मुळे पहिल्यांदाच यशाची चव चाखता आली. खरतर आनंद व्यक्त करण्यासाठी शब्दही अपुरे आहेत. ‘एक टप्पा आऊट’मध्ये मेण्टॉरची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली होती. या स्पर्धेत सहभागी होतानाच फायनलमध्ये माझे स्पर्धक सहभागी होणारच असा ठाम निर्धार केला होता आणि त्यानुसार तयारी केली. माझ्या टीममधले सर्वच स्पर्धक मेहनती होते. माझा विश्वास त्यांनी सार्थ ठरवला. महाअंतिम स्पर्धैतले तिनही विजेते माझ्या टीममधले आहेत हे सांगताना खूप अभिमान वाटतोय.’

 

विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना अनिशही भावूक झाला होता. स्टार प्रवाहचे खूप खूप आभार. त्यांनी दिलेल्या संधीमुळे आज मला ओळख मिळाली. माझं भाग्य समजतो की दिग्गजांसमोर परफॉर्म करण्याची आणि त्यांच्याकडून शिकण्याची संधी मिळाली. आरती सोळंकी यांच्यासोबतच अभिजीत चव्हाण, रेशम टिपणीस, विजय पटवर्धन या मेण्टॉर्सचंही मार्गदर्शन मिळालं. आता खऱ्या अर्थाने जबाबदारी वाढलीय. आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण दिल्याबद्दल स्टार प्रवाहचा कायम ऋणी राहिन अश्या शब्दात एक टप्पा आऊटचा विजेता अनिश गोरेगावकरने आपली भावना व्यक्त केली.